कापूस कोंड्याची गोष्ट

              रेवा ने तावातावाने बेड वर दप्तर फेकलं, आणि बडबड करत बाथरूम मध्ये घुसली. आईला कळून चुकलं होतं. हिचा रात्रीचा राग काही अजून गेला नव्हता. कालच तिचा मामा तिला भेटायला म्हणून खास पुण्याहून गावी आला होता. रेवा खूपच आनंदी होती. दिवसभर दोघांनी खूप धिंगा मस्ती केली. रात्री जेवणं आटोपल्यावर सर्व जण गप्पा मारत बसले होते. गोष्टी मागे गोष्टी सुरू झाल्या. आई आपल्या गोष्टी सांगू लागली, तर बाबा ही आपल्या लहान पणीच्या गोष्टी सांगू लागले. रेवाला खूप मज्जा येत होती. ती त्या गोष्टीत इतकी रमली होती की, तिला एक संपली की लगेच दुसरी गोष्ट हवी होती. त्याच त्याच जुन्या गोष्टी तिला नको वाटत होत्या. तितक्यात  तिच्या मामाने तिला छेडायला म्हणून प्रश्न केला.
रेवा, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....?
ती म्हटली "हो सांग ना !"
हो सांग ना काय म्हणते, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....?
हो !
हो काय म्हणते, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....?
सांग ना रे लवकर
सांग ना रे लवकर काय म्हणते, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....?
ती वैतागली आणि म्हटली.
शी बाबा, तू खूप डोकं खातोय मामा...
शी बाबा काय म्हणते, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....?
आता मात्र रेवा चिडली होती. आणि हट्टाला पेटली.
आता तर मला कापूस कोंड्याची गोष्ट ऐकायचीच आहे.
बाबा तुम्ही सांगा नाही तर आई तू सांग...
आता अस्तित्वात नसलेली गोष्ट सांगायची तरी कशी.... हा प्रश्न त्यांच्या समोर पडला.
एका गावात राम आणि शाम दोन बंधू राहत होते...
किंवा 
आट पाट नगर होतं 
किंवा 
मग एक होता राजा एक होती राणी.  सो गयी गुडिया खतम कहाणी.. 
असं सांगून ही तिला चालणार नव्हतं.  
हा प्रश्न रेवाच काय बऱ्याच मुलांना आणि पालकांना सुद्धा पडत असतो. की कापूस कोंड्या आहे तरी कोण?
मला ही पडला आणि मी शोध सुरू केला कापूस कोंड्याला शोधण्याचा. त्यातून वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. एका मुलाला असच कापूस कोंड्याची गोष्ट सांगू ? म्हणून दोन चार वेळेस विचारलं. तेव्हा तो ही रेवा प्रमाणे वैतागला आणि स्वतःचं कापूस कोंड्या नावाचं काल्पनिक पात्र बनवून मोकळा झाला. त्याचा परिणाम असा झाला की, तो त्याच्या सोबत खेळू लागला. पळू लागला. बोलू लागला. त्याची तासंतास वाट बघू लागला. यामुळे कापूस कोंडया तर काही सापडला नाही,पण मुलगा मात्र मनोरुग्णासारखा वागू लागला. वेळीच सावरलं म्हणून बरं झालं. अन्यथा अनर्थ झाला असता. म्हणून मला वाटलं हा कापूस कोंड्या आपण शोधून काढलाच पाहिजे. म्हणून जंग जंग पछाडायला सुरवात केली. वाचनालये शोधली. गूगल सर्च केलं. इ-बुक शोधली पण त्यावर प्रत्येक गोष्ट वेगळीच सापडली. कापूस कोंड्या मात्र सापडला नाही. शेवटी मग अडगळीच्या खोलीत जावून माझ्या आज्याच्या जुन्या वह्या चाचपायला सुरवात केली. माझा आजा एक उपेक्षित लेखक....  लिहायचा खूप छान पण हवा तसा प्लॅटफॉर्म मिळाला नाही. म्हणून त्याच्या वह्या त्याच्या नंतर अडगळीत पडल्या. तसं त्या रद्दीत जाणार होत्या पण आजीनं दंगा केला असता म्हणून आईनं जतन करून ठेवल्या होत्या. 
वह्यांची फारच दुर्दशा झाली होती. काही ठिकाणी वाळवी ने खाल्ल्या होत्या, तर काही पाने जीर्ण झाली होती.
डझन भर वह्या चाळायला मला फारसा वेळ लागला नाही. पण मला जे हवं होतं ते त्यात मला मिळालं.
त्या वहीच्या कवर वर मोठ्या अक्षरात लिहलेले होते.
कापूस कोंडा एक सकारात्मक ऊर्जा....
पहिल्याच पानावर एक कथा होती. तिचं नाव होतं....

"कापूस कोंड्याची गोष्ट"

             बहादरपुर नावाचं एक सदन गाव स्वातंत्र्य पूर्व काळात शिवानी नदीच्या काठी वसलेलं होते. त्या गावात एक सदन शेतकरी संपत रावजी कोंडा राहत होते. संपत राव गावाचे पाटील म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख कोंडा पाटील म्हणून झाली होती. संपत रावांना एका पाठोपाठ एक अशा पाच मुली जन्माला आल्या. आणि पुन्हा काही अंतराने तीन  जन्मल्या. या तीनच्या अध्यात मध्यात त्यांना तीन मुलं पण झाली पण एकही जगलं नाही. पूर्वीच्या काळात प्रचंड अंधश्रद्धा असल्या मुळे कुणी परीचीतांनी त्यांना सल्ला दिला. आता जर मुलगा झाला तर त्याचं नाव दगड, धोंडा, उकिरडा, शेण याला अनुसरून ठेवा. म्हणजे दगडू, धोंडू, उखर्ड, शेनफडू इत्यादी प्रमाणे. पुढच्या खेपेला कोंडा पाटलिन दैव कृपेने अर्थात संपत कृपेने म्हणायला हरकत नाही. गर्भवती राहिली. 
वाचत असतांना मध्येच मला हसायला आलं. माझ्या आज्याची विनोद बुद्धी त्याच्या लिखाणातून पुसटशी जाणवली. तशी आजी खूप सांगायची आज्या बद्दल. मी त्याने कल्पनेने त्याच्या बनवलेल्या गोष्टी पण आज्जी कडून खूप ऐकल्या होत्या. मी पुढे वाचायला सुरवात केली.  
कोंडा पाटलांना असली नावं काही पचनी पडत नव्हते. पण वंशाला दिवा हवा म्हणून त्यांनी अंधश्रध्देच्या आहारी जावून मुलगा झाला तर, त्याचं नाव.... अं..... काय बरं ठेवेन ? समोर कापसाचे गाठोडे पडले होते ते बघून म्हटले.... कापूस ठेवेन.. पाटलीन बाई ने पण डोक्यात विचार सुरू केला या वेळी माझ्या लेकराला वेगळं नाव दिलं म्हणजे तो वाचेलच. आणि तिचा नऊ महिन्याचा बारावा प्रवास सुरू झाला. आणि झालं ही तसच नवव्या महिन्यात कोंडा पाटलाच्या वंशाचा दिवा लागला. आणि ठरल्या प्रमाणे त्यांनी त्याचं नाव कापुसच ठेवलं. पण त्याला सहसा नावाने कुणी हाकच मारत नसत. सगळे कोंड्याच म्हणत. ते पोर मात्र पाटलाच जगलं.... कापूस कोंडा जसजसा मोठा होत होता तसतसं त्याला आपलं आगळं वेगळं नाव विचित्र वाटू लागलं. घरात पाटीलकी असल्या कारणानं त्याला दोन बुकं शिकायला मिळाली. चार शहाण्या माणसाचं बोलणं कानावर पडू लागलं तसतशी समज येवू लागली. अज्ञानाचा अंधकार दूर होत गेला. आपलं नाव अंधश्रध्देतून उदयाला आलं हे तो जाणून होता. त्यामुळे असल्या भाकड कथा आणि नकारात्मक विचार त्याच्या आसपास पण भटकत नसत. अशक्य ला शक्य कसं करावं. हे फक्त कापूस कोंड्यालाच माहित होतं. तो आपल्या सवंगळ्यानंची कामे त्याच्या विचाराच्या प्रभावाने सिध्द करून दाखवू लागला. म्हणतात आई गर्भावस्थेत जसा विचार करते बाळ तसेच आचार विचार आणि आकार घेतं. कापूस कोंडा बद्दल असच काही झालं होतं. कोंडा पाटलीन त्याच्या वेळी गर्भवती होती तेव्हा माझं या वेळच मुलं वाचेल हीच सकारात्मक ऊर्जा मनी बाळगून होती. त्यामुळे कापूस तर वाचलाच शिवाय त्याच्यात आईच्या उदरातून सकारात्मकतेने बीजारोपण आपसूकच झाले. बहादरपुरात कापूस कोंडाच्या शब्दाला मान मिळू लागला. तो सांगेन तसे होतेच असा अनेकांचा समज झाला. काही मंडळींनी तर तो भविष्य वेत्ता आहे अशी हवा पसरवायला सुरुवात केली. त्यामुळे कापूस कोंड्याचे सकारात्मकतेच वाण वेगळं वळण घेण्याची भीती त्याच्या मनात दाटली. म्हणून तो फार चिंतेत राहू लागला. त्यामुळे त्याच्या शरीरावर परिणाम होवू लागला. तो दिवसे दिवस सुकत चालला होता. हा पण एक नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आपण लवकर काही तरी पावले उचलावी. असे त्याने मनोमन ठरवले. भविष्य बघायला येणारे लोंढे कसे बसे परतवून लावले. एकदा रंगा लोहाराची कांती ओढ्याकाठी असलेल्या आंब्याच्या कैऱ्या पडायला दगडं मारत होती. पण कैरी पर्यंत तिचा दगडच जाईना. म्हणून यानं तिला सांगितलं. कांते अगं तुझ्या घागऱ्याला लुगड्या गत कास्टा करून खोस कमरेला तेव्हा लागेल ताकद आणि एकाच फटक्यात कैरी खाली. त्यावर कांती म्हटली तूच दे की पाडून दादा एक कैरी, मी लहानशी पोर कसं रे जमेल. अग मी सांगितलं तसं कर तर खरं.... आणि चमत्कार झाला. चमत्कार कसला, अगोदर ती एका हाताने परकर सांभाळत दगड फेकत होती. त्यामुळे जोर कमी लागत होता. आता कांतीच्या मनात कास्टा खोवलाय कमरेला. आता कैरी पडेलच अशी भावना निर्माण झाली. त्यामुळे तिच्या कडून अगोदर लावलेल्या जोरापेक्षा जास्त जोर लावला गेला. आणि दगड जावून कैरीच्या घसाला जावून लागला. एका फटक्यात तीन कैऱ्या खाली पडल्या. कांती आनंदाने नाचू लागली. कांती उत्साहात नाचत असतांना पाहून कापूस कोंड्याच्या मनात अशा भन्नाट गोष्टी रंगवायची कल्पना जन्माला आली. आणि तो आपल्या कल्पना शक्तीच्या बळावर लोकांना गोष्टी रंगवून सांगू लागला. त्याचा प्रभाव ही छान झाला. सगळी कडे कापूस कोंड्याच्या गोष्टी पसरू लागल्या.  अगदी किशोर वयात कापूस कोंडा पाटील नावारूपाला आला. आणि प्रस्थापितांचे धाबे दणाणले. त्याच्या या गोष्टींमुळे अज्ञान दूर होऊन आपले गुलाम आपल्याला सोडून जातील की काय अशी भीती प्रस्थापिताच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी कापूस कोंडा पाटलाला नेस्त नाबुत करायचं ठरवलं. आणि हालचाली सुरू ही केल्या. पण त्याच टप्प्यात एकोणीस शे बेचाळीस ची चलेजाव चळवळ सुरू झाली. आणि त्यासाठी कापूस कोंडा जो घराबाहेर पडला तो पुन्हा स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ही अनेक वर्ष परतलाच नाही. तोवर प्रस्थापितांनी कापूस कोंड्याला भीतीदायक पात्र म्हणून घोषित केले व तसा फैलाव ही केला. पण त्याच्या सोबत त्याच्या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या कथा मात्र ते पुसून टाकू शकले नाहीत. 

इतिश्री.....

मी पुढचे पान वाचेल तितक्यात माझ्या पाठीत एक जोरदार धपाटा बसला. आई जेवणा साठी कुठं कुठ शोधून आली होती पण तिला मी सापडलो नव्हतो. पण आजीने सांगितल्यावर ती अडगळीच्या खोलीत घुसली आणि एक जोरदार धपाटा माझ्या पाठीत घातला. मी कशी बशी ती वही काखेत दाबून पळत सुटलो. ते डायरेक्ट आज्जोच्या कुशीतच कारण पुढचा धपाटा वाचवण्या साठी दुसरा मार्ग नव्हता. बहुदा आज्जोला धपाट्याचा आवाज आला असावा म्हणून ती माझी पाठ चोळत आईला शिव्या घालू लागली होती. मी किलकिल्या डोळ्यांनी एकदा आज्जो कडे एकदा आई कडे बघत होतो. आज्जो आमच्या घरातील सुप्रीम कोर्ट त्यामुळे वसुधा म्हणजे माझी आई निमूट पणें स्वयंपाक खोलीत गेली आणि माझ्या साठी वाढून ठेवलेलं ताट आज्जीच्या पुढ्यात आणून म्हटली. घ्या अजून डोक्यावर म्हणे माझा सासरा आलाय जन्माला. निदान जेवायची तरी सुद असते का मामांजिंना लाडावून ठेवलाय नुसता. काय तर म्हणे आज्ज्याच्या कथा हा प्रकाशित करेल.  
कालांतराने कापूस कोंड्याच्या गोष्टी ही नामशेष होत गेल्या. 

पण 
"कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....." 

हे वाक्य मात्र आज एकविसाव्या शतकात ही जिवंत आहे. आणि सद्याची स्थिती बघता. अजरामर ही राहू शकते.

टीप:- आजची आपली कथा संपूर्णपणे काल्पनिक असून कुठल्याही जिवंत किंवा मृत व्यक्तींशी कोणताही संबंध नाही. तसे आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे सुरक्षित आहे. या कथेवर कसला ही प्रयोग करण्या आधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य आहे.
आपला अभिप्राय नक्की कळवा. ८२७५४ ९३२२१

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

प्रतिलीपी "भयकथा"

भयकथा