मृत्यूनंतरचे पत्र
प्रिय………
सखी,
कशी आहेस.......?
मजेत नक्कीच नसशील, माहिती आहे मला !
कारण तुझ्या उदास चेहऱ्यावरून असं दिसतय की, तू खूप विचलीत आहेस. पण तुला आता मजेत रहायला शिकायला हवं!
मला चिंता वाटते गं सखे तुझी कारण आता तू मनापासून खचली सुद्धा आहेस. खचायचं कारण ही तसंच आहे म्हणा! मी असा अचानक, तुला अर्ध्यावर सोडून निघून आलो. सर्व घरादाराची जबाबदारी, तुझ्यावर सोपवून आलोय. माझे म्हातारे आई-बाबा, आपली दोन चिल्ली-पिल्ली, आणि साऱ्या घराचा पसारा.....
कसं सांभाळशील गं हे सगळं?
याच विचारात मी अजून ही तुझ्या आजूबाजूला भटकतोय. म्हणून तुला हे पत्र लिहण्याचा खटाटोप केला. नाहीतर मेल्यानंतर कुणी कुणाला पत्र लिहतयं का? वेडे ……! पण मी लिहतोय, कारण तुला काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. तर गोष्ट अशी आहे की, मी तुला आर्थिक दृष्टीनं भक्कम करून आलोय खरा, पण मनाने……… मनाने तर तू अजून ही खूप कोवळी आहेस . परंतु आता तुला हे कोवळं मन अगदी कठोर करायची वेळ तुझ्यावर आली आहे. अन्यथा तुला हा बेगडी समाज, सुखा समाधानानं जगू देणार नाही. सखे! तुला कठोर होण्यासाठी तुझ्याच भूतकाळाची थोडी आठवण करून देऊ म्हणतोय......
तुला आठवतं? कदाचित तुला नक्कीच आठवत असेल, तू या जगात येण्याआधी तुझ्या आईच्या गर्भातच लढली होती. तुझा अंश जेव्हा तिच्या गर्भात आला होता. ते आठवं तेव्हा किती आनंदली होती ती……… कशी पुटपुटायची मनातल्या मनात,
मला बाळ होणार!
मी आई होणार!
खूप आनंद होता तिच्या चेहऱ्यावर, पण, पण तो आनंद तीन महिन्यापुरताच टिकला होता. तिच्या चेहऱ्यावर, तीन महिने तिनं अंगारे धुपारे लावले. मंतरलेली फळं खाल्ली, मुलगा होण्याच्या मोहात तुझ्या आईनं प्रसंगी काळी माती सुद्धा खाल्ली होती. तुझ्या आज्जीला आणि आईला मुलगा हवा होता. फक्त तुझे बाबाच तेव्हडे होते, ज्यांना ह्याच्याशी काही एक देणं घेणं नव्हतं, त्यांना फक्त बाबा व्हायचं होतं.
तीन महिन्यानंतर जेव्हा तुझ्या आज्जीनं गर्भ परिक्षण करायला लावलं, आणि तुझ्या असण्याच्या जाणिवेनं सर्वांचे चेहरे मलीन झाले होते. फक्त तुझ्या बाबांचा चेहरा तेव्हडा प्रफुल्लीत झाला होता. कारण त्यांना बहीण नव्हती ना ! आणि तू सुद्धा तुझ्या आईच्या डोळ्यांनी त्यांना रक्षाबंधन आणि भाऊबिजेला, बहिणीच्या विरहात रडतांना पाहिलं होतं.
हो की नाही ? आणि तेव्हाच तू पहिल्यांदाच जिंकली होतीस. या जगात येण्याआधीच…………… जिंकलीस खरी, पण उरलेले सहा महिने तू आईच्या गर्भातच निरंतर लढत होतीस. स्वतःच्या अस्तित्वासाठी. तुला साथ होती ती तुझ्या बाबांची, आणि त्यांच्या हट्टापुढे मग कुणाचं काहीच चाललं नाही. आणि इच्छा नसतांना ही तुझ्या आईला तुला गर्भात वाढवावं लागलं होतं. तुझी आज्जी गावठी औषधी देऊन, टोने तोटके करून तुझी वाट लावायची कुठलीच कसर सोडत नव्हती. पण या सर्वांवर मात करून तू जगलीस ! या जगात श्वास घेतलास, आणि तुझे कष्टाचे दिवस संपले. तुझा जन्म झाला तो बाबा नावाच्या वृक्षाच्या छायेत, कारण तुला सुरक्षा कवच तुझ्या बाबांच्या रूपात भेटलं होतं. तुझ्या जन्मापासून ते आपल्या लग्ना पर्यंत तू लाडात वाढलीस, बाबांनी तुला फुलासारखं जपलं .
मी ही तुला तसंच जपणार होतो, आणि जपलं सुद्धा ! पण असं कुठं माहीत होतं की तुला असं अर्ध्यावर सोडून यावं लागेल. खूप जगायचं होतं गं तुझ्या सोबत……… पण कदाचित नियतीला हे मान्य नसावं. असू दे , आता आलोच आहे, तर इकडेच रहावं लागेलच ना? आणि म्हणूनच तुला आता एकटीलाच लढावं लागेल.
सखे तुला आठवतं ? आपलं दोघांचं एक स्वप्न होतं ! आपल्या चिमुरडीला डॉक्टर बनवायचंय ………
आणि बाळ्याला इंजिनियर!
बनवशील ना गं ?
हुशार आहेत गं आपली चिल्ली-पिल्ली.
फक्त तुझ्या मार्गदर्शनाचीच आवश्यकता तेव्हडी आहे. अगं हो चिमुरडीला थोडी डॅसिंग ही बनव. कारण आजकाल रस्त्यावर लांडगे खूप दिसतात फिरतांना. सदा तत्पर असतात ते लचके तोडायला. आणि त्यातल्या त्यास कोवळ्या जीवाची तर गयच करत नाहीत ते.... अगं त्यांच्या डोळ्यातली भूक इतकी भयानक असते सांगू, अगदी स्वतःची बहीण आई जरी समोर आली तर ते सोडायचे नाही. म्हणून तिला मजबूत बनव. आणि एक गोष्ट लक्षात ठेवं कुणावरही लवकर विश्वास ठेवू नको, त्यातल्या त्यात पैशाच्या बाबतीत नकोच नको.
सखे ती पोस्टाची 10 लाखाची पॉलिसी आहे ना? ती चिमुरडी साठी वापर !आणि बाळ्यासाठी मॅच्युअल फंडाचे पैसे पुरतील तुला. तो गावाबाहेरचा प्लॉट विक हवं तर चिमुरडीच्या लग्नासाठी.... हवी तितकी हौस कर माझ्या लेकिची पण हुंडा म्हणून एक पैसा ही अजिबात देऊ नकोस. आणि बाळ्याचं लग्न करतांना एक पैसाही घेऊ नकोस मुलीच्या बापाकडून, सगळेच बाप परिपूर्ण नसतात गं……… परिस्थितीनं हरतात बिचारे.
किती तरी बापांना मी हुंडा देण्या इतका पैसा नाही म्हणून मरतांना पाहिलयं, आणि हो! त्या मासिक इनकम च्या दोन्ही पासबुकांची रक्कम आई-बाबांच्या हातावर ठेवं. तुला पैसे मागायला लाजतील ते..... तुझं पांढरं कपाळ पाहून रोज मरत असतील ते दोघं, कारण त्यांनी आपला जवान मुलगा हरवलायं !
हरवलं तर तू ही खूप काही, पण तुझ्यात मी स्फुर्ती भरु शकतो. आई-बाबांना मात्र कसं समजवू हेच कळत नाही. सखी, मुलांना हवं ते दे. पण अती लाडात वाया नको जाऊ देवूस. प्रेमा सोबत अनुशासन ही तितकंच आवश्यक आहे, यशोशिखर गाठायला. मला कल्पना आहे, तू त्यांना माझी कमतरता भासू देणार नाहीस.
असो तुला एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटतेय, अनाथालयाला देणगी दे, हवं तर वृद्धाश्रमांना भेटी दे, पण माझ्या श्राद्धाच्या भानगडीत मात्र अजिबात पडू नकोस. हे नुसते ढकोसले आहेत, तू परंपरा म्हणून करशील ही, पण त्याच्यामुळे मला शांती मिळण्या ऐवजी दुःखच होईल. म्हणून तितकं नक्की टाळ ! आणि हो, एक अजून महत्वाची गोष्ट तुला सांगायचीच राहिली. तू स्वतःची ही काळजी घे, कारण ती तू कधी घेतच नाहीस. तीन महिन्यापूर्वी तुला मानेचा त्रास उद्भवला होता. तेव्हा तू दुर्लक्ष केलं होतं. मी ही बाहेर गावी असल्यानं तुझ्याकडे फारसं लक्ष देऊ शकलो नव्हतो, त्याचीच राहून राहून खंत वाटते. त्याबद्दल मी तुझी हयात असतांना माफी ही मागू शकलो नव्हतो. पण आता मागतोय………
करशील ना गं माफ ?
ऐ……… रडू नकोस ना! तुला रडवायला नाही लिहलयं हे पत्र,
तुला खंबीर बनवण्यासाठी लिहतोय. जेव्हा खचायला होईल ना !……… तेव्हा आऊ जिजाऊंना, आहिल्याबाई होळकरांना, आठव. पेटून उठ, कल्पना चावला सारखी, उंच उंच भरारी घे, सुनिता विल्यम, प्रतिभा पाटील, मदर तेरेसा, यांच्या पासून प्रेरणा घे. आणि दाखवून दे या जगाला की पुरषाशिवाय ही नारी खूप काही करू शकते. ती अबला नाही राहिलीय आता.
करशील ना ? माझ्या साठी इतकं!
लिहायचं खूप आहे गं ! आणि वेळही भरपूर आहे आता.... पण तुझ्याकडे वेळ कमी आहे. जेव्हा तुझ्याकडे वेळ होता, त्यावेळी माझ्याकडे कडे वेळ नसायचा. तुला किती वेळेस वाटायचं, आपण टेरेसवर बसून हातात हात गुंफून तासंतास गप्पा माराव्या. आकाशातल्या चांदण्यांशी हितगुज करावं. पण मी सदैव संसाराचा रहाटगाडाच खेचत बसलो. कधी मायेनं तुझ्या डोक्यावरून हात फिरवलाच नाही. की कधी तुला काय हवं नको विचारलं सुद्धा नाही.
हो ! सुरवातीची काही वर्षे जगलीत आपण छान. पण तेव्हडी शिदोरी पुरेल का ? तुला………
नाही ना ! मग ते ही कर्ज राहिलं माझ्याकडे तुझं बाकी.
काही जण म्हणतात पुनर्जन्म असतो. असतो का गं ? ....... आणि जर असेल ना !तर राहीलेलं सगळं प्रेम परत करील मी तुला व्याजासहित.
शेवटचं एकच………… विचारात पडलीस ना काय सांगणार म्हणून ? हे तुझे सुंदर डोळे आहेत ना त्यात हे टप्पोरे अश्रू बरे नाहीत दिसत. म्हणून डोळे पुस बघू आधी! आणि गोड हस एकदा, हस ना !
बरं वाटेल गं मला……………
तुझा :- दिवंगत सखा
पत्र लेखन:- शिवा चौधरी(वास्तव)
कळमसरेकर
जामनेर,जळगांव
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें