"लेटरबॉक्स-पत्र लेखन स्पर्धा"

१. कोरं पत्र

                                                  चौकटीतला बदाम
                                                  १४३,विरह व्हिला
                                                        प्रेम नगर -०३

प्रिय सखी,
             तुझ्या नावाचा उल्लेख मुद्दामच करत नाहीये,
किंवा नावाचं पहिलं अक्षर ही लिहित नाही हं !
कारण तुला माहितीयं ? असं जर केलं ना, तर इतका गोंधळ होईल की सांगायलाच नको.
              पत्रास प्रयोजन वगैरे काही खास म्हणता येणार नाही, तरी कधीही व्यक्त न केलेल्या भावना अनावधानाने व्यक्त करायचा आज प्रसंग आलाय. म्हणून पोटातलं ओठात आणि ओठातलं बोटात आणून, म्हणजे लेखनीने कागदावर उतरवून गं ! आज व्यक्त होतोय.
     तसा आज रविवार अॉफिसला सुटी आणि कुठलं नियोजन ही नव्हतं, म्हणून निवांत पेपर वाचत बसलो होतो. पण आमच्या सौ. नं सारं घर डोक्यावर घेतलं होतं. कारण काय तर घरात पसाराच पसारा झालेला, आता मुलं म्हटली तर पसारा होणारच... हो की नाही! पण तिची आपली चिडचिड सुरूच, मुलांची रूम बघा काय घाण करून ठेवलीय यांनी. भिंतीवर चित्र काय काढताय, कागदं काय कापताय. आणि दप्तराचं कपाट ! ते तर रद्दीच्या दुकानापेक्षाही भयंकर करून ठेवलंय. तू ही करत असशील ना गं अशी चिडचिड....
   असो सौ. चे तेवर जास्त गरम झाले होते, ती म्हणाली अरे कार्ट्यांनों सुधरा रे..... अरेरे चुक तुमची तरी कशी म्हणू मी, बापालाच वळण नाही तर मुलं कुठून सुधारणार. शेवटच्या वाक्यातून सारं खापर माझ्यावर फुटल्याचं मला जाणवलं. मी हळूच हातातला पेपर बाजूला ठेवला, आणि एका शिस्त प्रिय विद्यार्थ्याप्रमाणे माझं कपाट आवरयला घेतलं. तर पुन्हा प्रहार झाला, मीच मेली व्दाड कुठून कपाटाचं नाव घेतलं. होता पसारा कमी होता का? जो अजून वाढवायाला घेतला. मी आहे म्हणून सगळं सहन करतेय, दुसरी असती तर केव्हाच निघून गेली असती. बहुतेक हा सगळ्याच बायकांचा डायलॉग.... तुझाही असेल नाही ? तिने तिची भुणभूण निरंतर सुरू ठेवली आणि मी माझं काम. त्यात आमचे चिरंजीव ! वय वर्षे ५, तुला सांगतो सखे...त्याला  जासूसीतला ज माहिती नाही पण ती करायला हे महाशय सगळ्यात पुढे !
     कपाट आवरता आवरता कुठल्यातरी जुन्या डायरीतून एक पत्र खाली पडलं. माझं लक्ष नाही, पण त्याला ते दिसताच त्याने उचललं. २५ पैशाचं ते जुनं  अंतर्देशीय पत्र ! त्यावर तुझा पत्ता लिहला होता. पण आतून मात्र ते कोरं होतं. तर म्हणतो कसा....
पप्पा हे फक्त पत्ता लिहलेलं "कोरं पत्र" कुणाचं हो? मी ते पत्र हाती घेतलं आणि अंतरंगात शिरलो. आणि विचार करता करता कधी हे पत्र लिहायला सुरवात केली, कळलंच नाही !
        कशी असते ना गं आपली किशोरावस्था....?
एक दुसऱ्या विषयीचं आकर्षक,आपल्याला प्रेम वाटू लागतं. कदाचित तुला मलाही असचं झालं असेल नाही!
बरं या बाबतीत वडिलधारे त्यांना कळल्यावर आपल्याला दोन गोष्टी समजवू ही पाहतात. कारण याच वाटेवरून चालतांना त्यांना ही मृगजळाचा भास झालेला असतो. मृगजळाकडे धाव घेतांना काटे ही बोचलेले असतात. पण त्या वेळेस ते आपल्याला आपल्या प्रेमाचा विरोध करणाऱ्या प्रेम चोपडा पेक्षा कमी भासत नाहीत. तूही किती दिवस तुझ्या मामाला प्रेम चोपडाच म्हणत होतीस. आठवतं कि नाही ? आणि एखादं दुसरा करतो ही मदत, जशी अनु ताईनं मला करू पाहिली होती. पण माझी  ही तेव्हा सीट्टी पिट्टी बंद झाली होती. तुला काय सांगावे, कसे बोलावे काहीच कळत नव्हते. आणि मनात एक भीती ही होती, की मी आवडत असेल की नाही तुला? कारण मनात भीती होती नसलेलं प्रेम भंग होण्याची, हिंमत नव्हती ...तुटलेलं मन सावरायची. ताईनं दिली होती हिंमत ही, पण मीच भित्रेपणा दाखवला होता. तेव्हा ताई बोलली होती... अरे बिनधास्त लिहं तिला पत्र! सांगून मोकळा हो. तुझे पत्र खूप बोलके असतात रे बाळा. ताई हिंमत देतादेताच, मला बाळा संबोधून लहान असल्याची जाणीव ही करून गेली होती. आणि तुला पत्र लिहायचं राहूनच गेलं. व तुला लिहण्यास आणलेलं पत्र, फक्त पत्ता लिहण्या इतकेच मर्यादित राहिले होते.
      ए ; पण आज लिहतोय हं, तुला पत्र..... फक्त मजकूर वेगळा आहे. तेव्हा वेगळा राहिला असता. म्हणजे ते काय म्हणतात ना....!
माझ्या प्रेम पाखरा, चितचोरा वगैरे वगैरे,.... आणि हो सखे, मी हे पत्र तुला साधं पोस्ट नकरता.....सोशल मिडीयावर पोस्ट करणार आहे. कारण तुला प्रत्यक्ष  पाठवण्याचा मूर्खपणा जर केला ना, तर आपल्या दोघांच्या संसाराचे १२ वाजल्या शिवाय राहणार नाही. तसं सोशल मिडीयावर पोस्ट केल्यावर ही होईलच म्हणा, पण त्याची झळ तुला बसाणार नाही. मला थोडी बसेल ! पण समजवेल मी तिला.....
आरडाओरडा करते गं, पण गोड आहे माझी साऊ.
लोकं म्हणतात, ॲरेंज मॕरेज यात्रेत विकत मिळणाऱ्या हरेकमालातल्या वस्तूंसारखं असतं. त्या सर्वात जी वस्तू छान वाटली ती आपण घेतो. आणि समाधान मानून घरी येतो. पण जरा बारकाईने बघितलं ना सखे, तर त्याचं हरेक मालात ५ रूपयाला ३ मिळणारे रबर बॕंड, अस्ताव्यस्त झालेल्या केसांना किती सहज बांधून ठेवातात ना! तसंच सेप्टी पिना ही आपलं काम चोख बजावातात, कधी पायात रूतलेला काटा अलगद काढतात. तर कधी भर बाजारात तुटलेल्या बटणाची जागा घेऊन आपली लाज वाचवतात. ॲरेंज मॕरेज झालेल्या नवरा बायकोचं पण काहीसं असंच असतं, फक्त गरज असते एक दुसऱ्याचं महत्त्व समजून घेण्याची. किशोरावस्थेतील आकर्षणाला, मृगयी प्रेमाच्या हार्टशेप मधून बाहेर काढण्याची.
आता आपलं; लग्न झालंय, मुलं बाळं झालीत. आपआपल्या संसारात आपण आनंदी ही आहोत. मग कशाला उगाच भूतकाळाला वर्तमानात खेचायचं. तसंही हळूहळू विसर पडत चाललाय, त्या व्यक्त न झालेल्या प्रेमाचा. अगं हो ! अजून एक गोष्ट..... तुझं लग्न झालं त्या वर्षी पाहिली होती मी तुझी धडपड, मला भेटण्याची. बहुतेक सगळं सांगून मोकळं व्हायचं होतं तुला, पण मी मुद्दामच टाळलं होतं तीला भेटायचं. मला नको होतं तुझ्या लग्नात विघ्न ! म्हणून तुला भेटलो ही नाही आणि बोललो ही नाही. पण माझं तुझ्यावर प्रेम होतं की नाही ? हे जाणून घेण्याची तुझी इच्छा लपली नव्हती माझ्या नजरेतून..... म्हणून हा प्रपंच आज केलाय.
मला तेव्हा खरंच खूप आवडायचीस तू! अं अं अं आज आवडत नाही असं नाही. पण तुझं हसणं, दिसणं, लाजणं सवरणं हे आवडायचं तेव्हा. याच आवडण्याला प्रेम म्हणतात का गं? कदाचित नाही. जर तुला हे पत्र वाचायला मिळालं ना,तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. तू आनंदी ही होशील, पण तो आनंद तू तितक्या पुरताच मर्यादित ठेवं. त्या आनंदाच्या लहरीत वाहून जाऊ नकोस. कारण पैलतिरावर क्षितिज असतं आणि क्षितीज म्हणजे नुसता आभास....! बरं तू गेलीस ही पैलतिरी, मग परत फिरतांना? खूप दम लागेल गं प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला पोहतांना.
      असो, तू म्हणशील किती बडबडतोय हा.... म्हणून एक शेवटचं, मी तुझ्या बद्दल लिहतोय की दुसऱ्या कुठल्या मुली बद्दल, हे आपल्या दोघांशिवाय कुणालाच माहिती नाही. पण आपले वर्ग मित्र मात्र कामाला लागतील..... ए कोण असेल रं ती, रिमा?  नाही  रे ती नसेल कदाचित. मग टिना की मिना? काही मेळ लागत नाही बाबा.....!
        असू दे, त्यांचा मेळ लागो अथवा न लागो. पण मी मात्र "कोरं पत्र" आज भरलंय.... तुझ्या साठी ! आणि  हो माझ्या साऊला ही ते आवडयं बरं का! चल काळजी घे, स्वतःची आणि नवऱ्याची ही. ए हसू नकोस आणि भेटलीस चुकून कुठे तर, मुलांना हा तुमचा मामा....म्हणून ओळख सांगू नकोस.
       चल बाय !

                                    तुझा ः- चौकटीतला बदाम



२. योनीचं पत्र

प्रिय विधात्या,
                 स.न.वि.वि. पत्रास प्रयोजन असे की....  इतकी वर्षे झालीत, पण माझी जात कोणती हे मला अजूनही कळलं नाही. ते माहिती करून घेण्यासाठी आज तुला पत्र लिहतेय, आशा करतेय तू पत्राच्या उत्तरात ती कळवशील.
काय, संभ्रमात पडलास ?
           कोण ही योनी? आणि काय लिहतेय ही असं!
प्रश्न पडणे सहाजिकच आहे बाबा..... पण मी तरी काय करू रे.... माझा संभ्रमच नाहीसा होत नाहीये.
आता तूच बघ ना! खैरांजलीत दलीत म्हणून भोगली गेली ती ताई, कोपर्डीत अत्याचार  झालेली ती मराठा ताई, दिल्लीतली निर्भया भगिनी,आणि मुंबईत अरुणाच्या रूपात खिळले होते कित्येक  वर्षे अंथरूणाला. या सगळ्या माझ्या धारिण्या,.,...
फक्त भोग म्हणून भोगल्या गेल्या.
या सगळ्यात कॉमन पॉईंट एकच ! तुला माहितीय कोणता?    नाही माहिती ! मग मी सांगते....  या सगळ्यात कॉमन पॉईंट "योनी" त्या नराधमांनी फक्त योनी म्हणून भोगली ती मीच !
तू माणसाच्या जाती पाडल्यास, तसेच माझी धारिणीही बाईच्या रूपात विभागलीस. पण माझी मात्र विभागणी केली नाहीस. 
म्हणजे कसं आहे ना! माझीही जात पाडली असतीस तर बरं झालं असतं.
म्हणजे हिंदू योनी हिंदूने भोगायची, मुस्लीम; मुस्लिमाने.... आणि दलीत योनीवर दलीतांचा अधिकार तर,मराठ्यांची फक्त मराठ्यांसाठी......
थोडक्यात काय, तर भांडणं उद्भवली नसती. व्यभिचार करणारा जातभाई म्हणून सोडून दिला गेला असता. किंवा लग्नाच्या बेडीत अडकवून दंडीत तरी केला गेला नसता. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्याला राजकीय रंग चढवता आला नसता.
तुला सांगतेय, इतका सुंदर तिरंगाय आपला ! की सांगायलाच नको. एकात्मतेच्या धाग्याने मस्त शिवला गेला होता तो. शांतीचं प्रतीक असलेल्या पांढऱ्या शुभ्र रंगावर प्रगतीचे अशोक चक्र किती उठून दिसायचं माहितीय ना!
पण धर्मांच्या सुईने उसवून काढलेत रे ते धागे.... प्रगतीचे चक्र खिडखिडं होत चालल्याचा भास होतोय. आणि रंगाचं तू जाणतोसच की,
हिंदू भगवा घेऊन फिरतोय तर मुस्लीम हिरवा
आणि बापड्या पांढऱ्या रंगाची तर दूर्दशाच झालीय. ज्याला हवा तसा रंगाच्या पेवात तो बुडवला जातो. आणि जातीच्या नावाखाली चढवला जातो. कधी निळा होऊन, तर कधी पिवळा! त्याच्यातली शांतीच गायब झालीय. तू देशिल का रे शोधून मला ती शांती? माणसांची मनं असंवेदनशील झालीयत. फारशा संवेदना नसतात आता मनामध्ये, आणि जिथे काहीशा संवेदना उरल्याय ना ! तिथल्या भडकवून संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. भिमा कोरेगाव आणि मालेगाव सारखे प्रकरणे घडवून.....
पण मी म्हणते भडकणारांनी तरी का भडकावं. त्यांच्या धडावर डोकं हाय नव्हं स्वतःचं, आणि अन्नच खात्यात ना सारी.... की श्यान खात्यात? त्यांचं तेच जाणोत बाबा !
      बरं ते जाऊ दे, घराघराचं काय ? गर्भलिंग परिक्षण केलं जातयं..... का तर म्हणे, मुलगी नको! अगोदर नवरा म्हणून रोज रात्री समाजमान्य बलात्कार करायचा, सव्वा महिन्यात प्रेग्नेंसी टेस्ट आणि ३ महिन्यांनी डॉक्टरांच्या टेबलावर मलाच उघडी करायची.... म्हणजे आतला माजला तरी कळेल.
बरं मुलगा असला तर सुटतो एखादा गर्भ , पण मी असले तर  परत त्रास. म्हणजे पहिली अंथरूणावर भोगली आणि दुसरी कापून फेकायला हे महाशय सज्ज (अर्थात काही अपवाद सोडून)
बरं एखाद्या डॉक्टराने नाही म्हटलं, तर नोटांचं पुंडकं सारायचं त्याच्या _ _ _ _
जाऊ दे जिथे सारायचं तिथे सारु दे त्या नोटा,
पुढे !  पुढचं काय?
जन्माला आल्यावर परत जाच, घराबाहेर जाण्यावर बंधने, राहणी मानावर बंधने.....
कुणी बापानं मोकळी दिली तर आईचं बंधन ! दोघांनी जरा स्वातंत्र्य देऊ केलं, तर कुत्र्यांच्या नजरा..... कोणता डाबर मॕन केव्हा लचका तोडेल, सांगताच येत नाही बाबा!
बरं इतकं सारं झाल्यावर हे सारं थांबतं असंही नाही. यानंतर कितीतरी सैराटच्या अर्च्या धारातिर्थी पडतात एकामागून एक. त्याही माझ्याच धारीण्या, नाही का....!
बरं नोकरी करायची म्हटलं तर बरेचसे बाॕस तीच अपेक्षा ठेवतात. तेही जात न बघता !
बरं भोगतानां यांना प्रिकॉशन नको... का तर म्हणे भोगातली मजाच नाहीशी होते.
चल क्षणभर तेही मान्य, मग काही झालंच तर लग्नाला तरी तयार हो ना, बॉस म्हणवून घेणाऱ्या भामट्या...., पण तेव्हा मात्र तो शेपूट घालतो. आता कुठं घालतो तेही मीच सांगायचं का?
कसा रे तू विधात्या..... वाचकांना तरी कळालयं बघ हसताय ते.
        असो, यानंतर हा प्रवास थांबतो असं ही नाही. पुढचं स्टेशन असतं लग्न !
मग लग्न आलं तर मानपान आला, हुंडा आला. बहुतेक हि प्रथा हि तुझ्या नावानेच सुरू केली होती तेव्हाच्या ठेकेदारांनी.... ते वरदक्षणा की, काय म्हणतात ना, ते! बरं हुंड्यातही यांना हुंडाईची गाडी पहिजे, भले गाडी लावायला त्याच्या दारात जागा नसू दे. बरं दिली आमच्या बापाने गाडी कर्ज काढून म्हण, की कशीही म्हण(नंतर फाशी घेऊन मरणं का होईना) तर या बहाद्दराला चालवता येत नाही. हे असं असतं राव......
बरं एखादा असा बहाद्दर तू तरी कधी पाहिलाय का? ज्याने हुंड्यात भेटलेल्या गाडीवर "सासरचं दान" असं लिहलंय. नाही ना! कन्यादानातच असते ना रे ती गाडी, मग लिहायला काय बरं हरकत आहे. पण अं हं!
       बरं अजून पुढचा भाग तर खूपच वाईट बाबा, हे सगळं नभेटता लग्न झालंच जोर जबरदस्ती. तर पुन्हा छळ! छळ ही असा तसा नाही, तर अगोदर भोगभोग भोगायची. नंतर हाणायची, मारायची, प्रसंगी ज्या योनीला भोगली, तिच्यावर सिगारेटचे चटके द्यायचे. जीव जाईपर्यंत _ _ उपटायची. असू दे बाबा...  बहुतेक हेच वाढून ठेवलंय आमच्या ताटात, मग आम्ही तरी का भलती अपेक्षा करावी. फक्त एका गोष्टीची खंत वाटते.... की तू ज्यांना ही, वर्ण प्रथा निर्माण करण्याची बुद्धी दिली होतीस ना! त्यांना माणूसकी पेरायची शिकवण दिली असतीस तर बरं झालं असतं.
          असो, तू बरा आहेस ना? असायलाच हवा! रोज रोज वेगवेगळ्या तत्सम संस्थानात तुझ्या नावाने माया जी जमा होतेय. तू कर आराम त्या सोन्याच्या सिंहासनावर..... मी लढेन माझी लढाई मीच, तुला नाही विनवणार...... न्यायासाठी ! कारण कसं लढावं व कसं जाळावं हे शिकवून गेल्यात आम्हाला आमच्या आई जिजाऊ! सावित्री माई आणि बऱ्याच जणी. बरं आता थांबते. तू काळजी घे स्वतःची असं बिलकुल न म्हणता. कारण दगडाची काळजी घेणारे असंख्य माणसं तुला इथं दिसतील.पण माणसाची काळजी घेणारा माणूस मात्र सापडणार नाही.
           जय जिजाऊ !

ता.क. या पत्रातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा लेखकाचा यत्किंचितही हेतू नाही. आणि तरी ही त्या दुखावल्या असतील तर.... त्यांना फाट्यावार न मारता, लेखक क्षमायाचना करतोय. आशा करतो आपण माफ कराल!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

प्रतिलीपी "भयकथा"

भयकथा

कापूस कोंड्याची गोष्ट