टमरेल

टमरेल

              राघव जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहचला तेव्हा सकाळचे साधारण साडे ९ वाजले होते.
सगळी कडे कामाची लगबग सुरू होती, प्रत्येक जण अगदी वेळेवर येऊन कामात लक्ष घालून बसले होते.आज हे बघायला त्याला  जरा वेगळंच वाटत होतं. सरकारी कार्यालय आणि इतकं शिस्तबद्ध काम! तो मनातल्या मनात पुटपुटला, कारण या पूर्वी ही तो येथे येऊन गेला होता. पण तेव्हा वातावरण वेगळंच होतं. कदाचित नवीन रुजू झालेल्या जिल्हाधिकारी बाई  मंजिरी आत्र्यांचा हा प्रताप असावा. कारण त्या आपल्या कामात कधीच कचुराई करत नसत, आणि इतरांवर ही वचक ठेवत असत असं त्याने ऐकलं होतं. ईमानदारी आणि गोरगरिबांना समान हक्क मिळवून देणे ही त्यांची अग्रीम भुमिका होती. आणि म्हणूनच राघव आज गावगाड्याचे अटकून पडलेले किंवा मुद्दाम उद्दाम पणाने बाजंद्या पुढाऱ्यांनी लटकवून ठेवलेले कामं घेऊन आला होता. पाच वर्षे होत आली होती त्याला सरपंच होऊन, पण गावातला नालायक पुढारी आणि याचा सख्खा मामा बन्सी आपल्या चांडाळ चौकडीला हाताशी धरून, राघवला गावकऱ्यांच्या नजरेतून उतरवायला सदैव तत्पर असे. राघवने मार्ग काढायचा आणि यांनी कामात बिबा घालायचा हे समीकरण ठरलेलं. आणि त्यात वरच्या कार्यालयात बन्सीचे भाडखाव अधिकारी, त्यामुळे गावची सत्ता हातात असूनही त्याला काही करता येत नव्हतं. पण आता त्याला मंजिरी आत्र्यांच्या रूपात आपल्या कामाची पूर्ती दिसत होती. आणि कदाचित त्यामुळेच अजून बरीच मंडळी आपआपली कामे मार्गी लावून घ्यायला तिथे जमा झाली होती. मॕडम बरोबर १० ला येतील, सर्वांनी आपआपल्या नंबर नुसारच आत जायचं, तोवर सर्वजन या हाॕल मध्ये बसा. असा फर्मान सोडत शिपायाने काॕन्फ्रन्स हाॕल उघडून दिला. आणि अजून एक लाचलुचपतीचा शब्द सुद्धा उच्चारायचा नाही, नाहीतर सरळ जेलाची हवा खाल असं बजावून तो निघून गेला. राघव आवाक होऊन त्याच्याकडे पहात राहिला, कारण मागच्या खेपेला राघवने फाईल सरकवायला विस रूपये दिले नाही म्हणून याच शिपायाने सर्व आॕफिस डोक्यावर घेतलं होतं. आणि त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांनी ही त्या शिपूर्ड्याचीच साथ दिली होती. आणि राघवला मुग गिळून बसावे लागले होते . आणि म्हणूनच राघव त्याच्या लाचलुचपतीच्या वाक्यामुळे त्याच्या कडे पहात राहिला. तोवर इतर उपस्थित मंडळी आत हॉलमध्ये जाऊन स्थानापन्न झाली. हॉल जास्त मोठा नव्हता, त्यामुळे तिथे खुर्च्यांची संख्या जेमतेमच होती . दोघं चौघं एका बाकावर बसले. राघव आत येताच त्यांनी  राघवला बसायला जागा करू पाहिली, पन राघवने चेहऱ्यावर हलकेच  स्मित आणत नकार दिला. आणि हॉलचं निरिक्षण करण्याला प्राथमिकता दिली. हॉलच्या खिडक्यांवर हलके गुलाबी रंगाचे पडदे लटकवण्यात आले होते, भिंतीवर सुंदर सुंदर पेंटिंगंस् लटकवल्या होत्या. राघव एक एक पेंटिंग बघत बघत पुढे सरकत होता, तितक्या त्याचे लक्ष एका विलक्षण पेंटिंग कडे गेलं. पेंटिंग मध्ये दोनचार स्त्रिया गावा बाहेर उघड्यावर शौचास बसल्या आहेत, एक महाभाग काही अंतरावर एका झुडपा आड शौचास बसलाय आणि  तिथूनच शौच करता करता शौचास बसलेल्या स्त्रियांना चोरून बघतोय. दोघांच्या मधून एक पाऊल वाट जातेय, त्यावर एक खोडकर मुलगा पायाने पत्री डबा फुटबॉल गत उडवतोय. बहूतेक तो डबा ( म्हणजेच "टमरेल") त्या महाभागाने ढुंगण धुण्यासाठी ठेवलेला असावा . राघवला ती पेंटिंग पाहून खूप हसायला आलं. आणि हसत हसतच तो फ्लैशबॕक मध्ये शिरला.
              रघ्या..... ओ रघ्या....... जरा बकऱ्या सोड रं दावनिच्या, अन मंग जा साळंला..... बायजा आक्कानं फरमान सोडलं. पण ते ऐकायला रघ्या तिथं नव्हताच, आय मला उशिर होतूय ! म्हणत पाठीवर दप्तर टाकून पसार झाला . रस्त्याने दोन चार कोंबड्या उगाच भिरकवून लावत शाळेकडे पळाला. बायजा आक्का  मागून कुरकुर करत राहिली. तिची कुरकुर ऐकून रेवा बाहेर येत म्हणाली. का उगाच मागं पडता बायजा आक्का, पोर गुणाचं हाय तुमचं !
कसलं गुणाचं गं रेवा, समदं गाव हुंदळत असत. कुणाची ना कुणाची खोडी केल्या वाचून रहातच नाय. लय नाकात दम करतो बाय....त्यात मी पडली रांडमुंड बाय. मी मेल्यावर काय हुईल याचं देवच जाणे. बोलत बोलत बायजा काकू रेवाच्या अंगणात आली. असं का म्हणता वं आक्का, मरोत तुमचे दुश्मन मेले. बसा वाईच म्हणून रेवाने बायजा आक्काचा हात धरून बाजेकडे नेलं. हातातला खराटा बाजूला ठेऊन बायजा आक्का  रेवा जवळ बसली. रेवा अंगवाडी सेविका, बायजा आक्का  च्या शेजारच्या खोलीत राहायला होती. रेवाची मुलगी रघ्याच्याच वर्गात होती, रेवाला मुलगी झाली म्हणून नवऱ्यानं रेवाला मुलगी सोबत टाकून दिली. आणि गेला फारेनच्या एका गोऱ्या चामडी सोबत निघून, त्याचं पुढं काय झालं कुणालाच काही माहित नाही. पण रेवानं हिंमत न हारता अंगणवाडी सेविकेचा कोर्स केला. तिनं लहानपणी शेतात कामाला जाऊन जाऊन केलेली मॕट्रिक तिच्या कामाला आली होती. रेवाचं मुळ गावं नगर जिल्ह्यात होतं. पण नोकरी इथं मिळाली म्हणून ती ५ - ६ वर्षापासून इथंच वास्तव्याला होती. बायजा आक्काचा दिर मुंबईत कामाला होता म्हणून त्यानं आपलं घर वहिनीला वापरायला दिलेलं. आणि बायजा आक्कानं त्याच घरात रेवाला आसरा दिला होता. दोन बिन नवऱ्याच्या बाया एकमेकांच्या सहाऱ्यानं रहात होत्या. रघ्या आणि मंजी एकमेकात मिळून मिसळून रहायचे, खेळायचे. रेवा अधूनमधून दोघांचा अभ्यास ही घेत असे, त्यामुळेच तो हुशार आहे !  हे रेवा बायजा आक्काला विश्वासानं सांगत असे. आजही रेवानं बायजा आक्काचं सांत्वन केलं, रघ्याच्या हुशारीच्या चार गोष्टी सांगितल्या..... दोघं गप्पागोष्टी करतच होत्या तोवर चिंघट्या आरडत आरडत आत शिरला. बायजा आक्का .... ओ बायजा आक्का
कोन हाय रं ? आणि कशाला कोकलतोय मेल्या डुकरागत.
तसा अंगणात  आलेला चिंघट्या बोंबलला अगं इकडं य आधी आणि मला सांग, तुझ्या रघ्याला तू शिकिवती का? मी शिकिवू धडा...!
तशी बायजा काकू तावातावानं आपल्या अंगणात आली अन् जवळजवळ ओरडलीच, हे बघ ये, ......  चिंघट्या तुझं काय जं भांडण आसल ना ते रघ्या आल्यावर सांग. आता मला लई कामं हायत बाबा.
अगं पण माझं आयक तरी.....!
अजिबात येळ नाही ! नंतर म्हंजी नंतर.
आता बायजा आक्काचा फर्मान म्हंजी कोर्टाचाच आदेश. कारणही तसंच होतं, या गावात दहशत होती ती बन्सी मामाची आणि बन्सी बायजाचा सख्खा धाकटा भाऊ. आणि त्याची टरकायची फक्त बायजा आक्कालाच..... आणि म्हणूनच तिच्या वाटेला सहसा कुणी जात नसे. पण चिंघट्या चांगलाच इरंला पेटला होता. म्हणून रघ्याची मधली सुटी व्हायची वाट पहात, बायजा आक्काच्याच अंगणात ठाण देऊन बसला होता. चिंघट्याला रघ्या रोजच डिचवायचा पण तो कधी  मनावर घ्यायचा नाही. तोही रघ्याला बन्सी मामाचा जावाई म्हणून चिडवायचा. बन्सी मामाला एक मुलगी होती , नाव होतं सुंदरी आणि नावा प्रमाणे ती सुंदर ही होती. दोघांची नोकझोक चालतच असे.... पण आज मामला जास्तच बिघडलेला जाणवत होता, चिंघट्या बसल्या बसल्या अधूनमधून बडबडत होता. कारण हि तसंच होतं.....
रघ्या आयला हुल देऊन शाळंकडं पळाला, तेव्हा शाळेला जरा उशिरच झाला होता म्हणून त्याने बरडाच्या रस्त्याने शॉटकट मारला. तसं बरडाच्या रस्त्याने माणसांची फारसी वर्दळ नसे, त्यातल्या त्यात सकाळी तर बिलकुलच नसे. कारण गावातल्या समद्या बायका पोरी शौचास तिकडेच जायच्या, तशा समद्या पायवाट सोडून लांब आडोसा बघून बसायच्या त्यामुळे पायवाटेनं कुणी पोरगं सोरगं गेलं तरी त्या कानाडोळा करून बसून राहायच्या. तसंच आजही रघ्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. तो आपल्याच धुंदित पळत चालला होता..... तसा छपाककककक असा आवाज झाला. रस्त्यात पडलेला  पाण्याचा भरलेला डबा (टमरेल) फुटबॉल सारखा हवेत उडाला. दोनचार बायका ज्या परसाकडला बसल्या होत्या, त्या ढुंगणं झाकत उभ्या राहिल्या. जवळच्याच झुडूपा आड चिंघट्यापण परसाकडला बसला होता. तोही चड्डी सावरत उभा राहिला. त्याला पाहून रघ्याची सिट्टी बंद झाली आणि तो तिथून तिसराच मार्ग धरून निसटला. तो थेट शाळेतच..... जो रघ्या लवकर शाळेत पोहचणार होता. तो मार्ग बदलल्यानं परत लेट झाला. प्रार्थना संपून मास्तर  हजेरी घेत होते. रोल नंबर दहा..... रोल नंबर दहा मास्तरांनी दोन वेळेस पुकारा केला. तिसऱ्या वेळेला मास्तर ओरडून म्हणाले रघ्या,,.... तितक्यात रघ्या वर्गाच्या दारात धापा टाकत पोहचला. मास्तरांनी चष्मा नीट करत दाराकडे पाहिलं आणि आपल्या रूबाबदार आवाजात प्रश्न केला. का? लेट कसे ?
धापा टाकतच रघ्या उत्तरला सर ते "टमरेल" चिंघट्या , परसाकड त्याला काय उत्तर द्यावं तेच कळंना, तो पुरता बावचळला होता. सगळा वर्ग फिदी फिदी हसायला लागला. मास्तरांनी डस्टर दोन वेळ टेबलावर आदळला. कोर्ट शांत व्हावं तसा सगळा वर्ग शांत झाला. मास्तरांनी डोळ्यांनी इशारा देताच रघ्या जागेवर जाउन बसला. मधल्या  सुटीत दोन चार पोरांनी रघ्याला घेरला, काय झालतं रं रघ्या ? म्हापशेकरानं प्रश्न केला.
काय नाय रं.... उशिर झाला म्हणूनशान बरडाच्या वाटनं येत होतो. तर रस्त्याकडंला तो चिंघट्या शेरायला बसल्याला, आणि टमरेल त्यानं रस्त्यातच ठेवल्यालं. मी उशीर झाला म्हणून धावत निंघाल्यालो. तर लागली लात टमरेला आन् गेलं ते पाण्यासंगट हवेत...! लागली की मारलीस रं ? सरलीनं प्रश्न केला.
आगं चुकून लागली .
पर म्या म्हणते तो चिंघट्या बरडावर गेलाच कशाला?
च्यायला यं सरले डोक्यावर पडलीस काय गं !
कशाला जात्यात बायका माणसं तिकडं ?
आरं बाबा तिकडं बायका जात्यात फकस्त, माणसं न्हाय. आणि तू कुठं जातोस रोज ? तुला माहित नाय व्हय.
मी ते आपलं... रघ्या परत चाचपडला.
का जातच नाय, म्हापशेकर मध्येच कडमडलं......
ए गप ए म्हापश्या, तुझ्या गत हाय व्हय लेका! तुला दर तीन दिवसांनी ईनिमा करावा लागतो. सांगू का समद्यास्नी, तसा पुन्हा हशा पिकला. तोवर मंजी ही तिथं आली होती. परत सरलीनं तोच प्रश्न केला. तसा मंजीनं तिचा दंड धरून बाजूला नेला. सोबत इंदी आणि म्हाली पण आल्या. आणि वाण्याच्या इंदीनं सरलिला तिच्या प्रश्नाच उत्तर दिलं.
बारिक आवाजात सरली म्हणत होती. परवा माझ्या आयला लिली सांगत हुती बरडावर उजाडलं की परसाकड जाऊ नका म्हणे. गावातली चवटाळ पोरं म्हणे झुडूपा आड लपून बायकांची उघडी ढुंगणं बघत्यात.....!
मग बायकांनी बाहेर  जाणं बंद कराया पायजेल, मंजीनं सजेशन दिलं.
वा गं वा मंग कुठं  बसायचं घरात? केव्हा पासून गप्प् असलेली म्हाली बोलली.
अगं घरात कशापायी बसते म्हाले, संडास बांधायला पाहिजे ना घरोघरी .....
पण बांधणार कोण? कुणाचं काय बी अडलयं, असं दिसत न्हाय बाये.  सरकारी बांधल्यात दोन चार तर तिथं पाणीच न्हाय टाकाया. घरून एक टमरेल घेऊन जात्यात ते बी कधी कधी दोन जणात..... अशात धुतली की सुटली माणसं घराकडं, नुसता ईट येतो बाये. म्हणून आम्ही समद्या बरडावरच जातो.
अगं ते चांदे गुरूजी नाय का म्हटले, ते घर तिथं शौचालय योजना हाय म्हणून..... आपण त्याच्या साठी मागणी करू सरपंचास्नी मंजीनं नवी शक्कल सांगितली. इंदिनं लागलीच मंजीला दुजोरा दिला.
ये बये तुमचं ठीक हाय गं पण आम्ही असं केलं तर आमची उद्यालाच साळा बंद हुईल बाये. सरलीनं वस्तुस्थिती बोलून दाखवली. आणि खरचं तसं झालं ही असतं कारण गावातली मंडळी कमी शिक्षीत असल्यामुळे त्यांचे विचार अजून ही गंजलेलेच होते. जसा मुलींच्यात या बाबतीत भेदाभेद होता, तसा मुलांच्यात ही सुरू होता. फक्त मुली हळू आवाजात बोलत होत्या तर मुलांनी सारं मैदानच डोक्यावर घेतलं होतं. त्यांचा हा गोंधळ ऐकून चांदे गुरूजी मैदानावर आले, त्यांनी रघ्या कडून नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेतलं. मधली सुटी संपून वर्ग पुन्हा सुरू झाला, तास चांदे गुरूजींचाच होता.  आणि त्यांना टमरेल प्रकार माहिती झालाच होता. तर गुरूजींनी बोलायला सुरूवात केली.....
तर मुलांनो आज आपण हायजीन आणि सेनीटेशन बद्दल शिकणार आहोत. काय असतं सर हे गण्याने सवयी प्रमाणे प्रश्न केला. गण्या वर्गातील अजब कॕरेक्टर, येत जात काही नाही पण प्रश्न याचे हजार.....
याचा प्रश्न ठरलेला म्हणून गुरूजींनी ही गमतीदार उत्तर दिलं. "टमरेल"
तसा संपूर्ण वर्गात हशा पिकला, गुरूजींनी टेबलावर पडलेला डंडूक टेबलावर आदळून वर्ग शांत केला. आणि खरंच टमरेलावरच सारा तास संपवला. मुलांना स्वच्छते विषयी खूपच सोप्या आणि त्यांच्या सोबत घडलेल्या गमतीदार घटनांचे दाखले देत सरळ भाषेत हायजीन आणि सेनीटेशन शिकवले. दुपारचा दिड वाजला शाळा सुटली तशी रघ्याच्या वर्गातील बरीचशी मुलं बरडाकडूनच घराकडे धावत सुटली. त्यांचं बघून इतर वर्गातील मुलं ही तिकडूनच पळाली. रघ्या आणि मंजी मात्र नेहमीच्या रस्त्याने घराकडे निघाले होते. घरी पोहोचले तेव्हा चिंघट्या दारातच बसून होता, त्याला बघून मंजीला खूप हसायला येत होतं पण तिने ते कसं बसं दाबलं या दोघांना पाहून चिंघट्यानं परत गोंगाट सुरू केला. बायजा आक्का ..... ओ बायजा आक्का ये बाहेर, आणि आरती घेऊन ये गं !
बघ तुझा पराक्रमी पुत्र आलाय बायजा आक्काला तर चिंघट्याचा विसरच पडला होता. पण त्याचा गोंगाट ऐकून ती बाहेर आली. आणि घरात घुसणाऱ्या रघ्यावर ओरडली. काय केलं रे मेल्या ह्याला, सकाळ पासून ठाण मांडून बसलयं हे बेणं.
तसा रघ्या एकदा घाबरला पण हिंमत करून बोलला.... म्हणजे घरी गेलाच नाय व्हयं सरळ बरडावरनं हितच आलास काय?
व्हय व्हय तवा धरनं हितच बसलोय म्या!
आता मात्र मंजी कडून हसू दाबलं गेलं नाही. तसा चिंघट्या तिच्यावर ओरडला, तू कशापायी दात ईचकतिया ? तशी ती गप्प झाली. तरी रघ्यानं तिला हळूच विचारलं..... काय झालं मंजे?
आरं ह्यो म्हणतोय बरडावरनं डायरेक् हितच आला, म्हणजे सकाळ पास्न न धुताच बसलाय. आता दोघे जोरजोरात हसायला लागले. आता मात्र बायजा आक्का ही गोंधळली. हा काय प्रकार आहे तिच्या ही लक्षात आला नाही. तशी ती रघ्यावर ओरडली, आता सांगतो की टांगू उलटा. आता रेवा ही अंगणवाडीतून घरी पोहचली होती. रघ्यानं सारा वृत्तांत बायजा आक्काला सांगितला, आणि आता मात्र रेवा आणि बायजा आक्का ही हसायला लागल्या. आणि आय आणखी एक ह्यो तिकडं म्हणे बायकांची उघडे ढुंगणं बघायला जातो. इतकं ऐकताच चिंघट्या घाबरला, आता बायजा आक्का आपल्यालाच बोलणार म्हणून तो ढुंगणाला पाय लावत चिंगाट पळाला. मग सारेच हसायला लागले. आज सगळा दिवस मंजी आणि रघ्या  त्याच विषयावर बोलत होते. सायंकाळी जेवण खाणं आटोपून त्यांनी बराच वेळ अभ्यास केला आणि सकाळी रविवार असल्याने जरा उशिराच आपआपल्या घरी झोपायला गेले. अशाच एका रविवारी सकाळी बरडावरचा गोंगाट ऐकून सारा गाव जागा झाला, रघ्या मात्र ढाराढूर झोपला होता. मंजी अंथरूणावर पडल्या पडल्या, बायजा आक्का आणि रेवाचं संभाषण ऐकत होती. रेवा म्हणत होती, आक्का बरडावर खरंच एकदम तिन देव्या परगट झाल्या असतील का वं?
काय जुनं बाय.... जरा उजाडलं की जाऊ बघाया.
समद्या बायका म्हणं पुरषायच्या हागणदारी कडं पळाल्या, पाहटं पाहटं ! म्हणून लय गोंगाट झालता गावभर. आपलं बरय बाई तुझ्या अंगणवाडीच्या शौचालयावर भागून जातं.
गाव तसं छोटं असल्यामुळं सगळं कसं मोजून मापूनच... चावडी एक १० × १० ची खोली, शाळा ८ वी पर्यंतच, ते पण पावसाळ्यात भदिभदा गळणाऱ्या खोल्यात भरायची. तसच हगणदारीचे ही वांधेच. पूर्वेला पाणवठा, उत्तरेस खोल दरड, पश्चिमेला बायकांची हगणदारी आणि दक्षिणेस माणसांची हगणदारी. अन् इज तर बायकांच्या हगणदारी कडच्या बरडावर अचानक तीन देव्या परगट झाल्या आसं ऐकलं आणि  बायकांची त्या दिवशी पंचाईतच झाली. मग काय तो दिवस काढला बायकांनी कसाबसा पण पुढं काय ? जिथं जिथं देव्या परगट झाल्याचं बोललं गेलं तिथं तिथं भोला भगतानं ३दगडं शेंदूर फासून ठेवले. आणि  बायकांना तिकडं जायला मज्जाव केला. दोन चार दिस कसेबसे निघाले पण आता गावात हगणदारी वरनं भांडणं व्हायला लागली. पंचायत बसली, आणि एकमतानं निर्णय झाला की गावचा सरपंच बन्सी लाल गावात शौचालयास शासना कडून मिळालेला निधी वापरून, घरोघरी शौचालय बांधून देणार. बन्सिची चांगलीच पंचाईत झाली, कारण त्यानं कागदावर संडाशी केव्हाच बांधल्या होत्या. आणि तो पैसा खर्च करून मोकळा झाला होता. आता बन्सीलाल खूप अस्वस्थ झाला होता, काय करू काय नको त्याला काहीच कळत नव्हतं. म्हणून त्याने हा काय प्रकार घडला आणि कसा घडला व याच्या मागे नेमकं कोण आहे. हे शोधून काढायचं काम सरपंचाने चिंघट्या ला दिलं, आणि चिंघट्या जोमाने कामाला ही लागला. सर्वात अगोदर त्या परगट झालेल्या देव्या कुणाला दिसल्या, त्या काय बोलल्या हे चिंघट्यानं शोधून काढलं. त्यात लिली, इंदी, म्हाली या दोन चार पोरी होत्या. चिंघट्यानं लिलीला विश्वासात घेऊन सारा वृत्तांत काय आहे ते विचारलं. लिलीनं सुरवातीला नानुकूर केली पण चिंघट्याच्या चिकण्या चोपड्या गोष्टीत फसली आणि हे सारं कारस्थान रघ्या आणि मंजी आहे सांगून मोकळी झाली.
चिंघट्या आणि टमरेल प्रकरण घडल्या नंतर मंजी आणि रघ्यानं या विषयावर खूप मंथन केलं होतं. आणि गावाची भौगोलिक स्थिती आणि लोकांच्या देवभोळे पणाचा फायदा घेऊन गावात शौचालयं बांधून घेण्यासाठी, हा देवी परकट होण्याचा वग रचला होता. लिली आणि तिच्या  सोबतीच्या पोरींना खरं वाटावं म्हणून रघ्या त्या रात्री साडी चोळी घालून स्वतःच एक देवी बनला होता. आणि दोन ठीकाणी उगाच कणकेचे दिवे लावून गुलाल भंडारा उधळला होता. त्यासाठी त्यानं पंतगाच्या मांजाचा वापर करून, एकाच ठिकाणहून सूत्र हलवाली होती. आणि गाव जागा होण्या आधिच परत येऊन झोपला ही होता. पण नेमकं त्या वेळेलाच कुणी तरी बाया माणसाचं शौचास जाणं गरजेचं होतं. अन्यथा प्लान सक्सेस झाला नसता, आणि म्हणूनच त्यांनी इंदीची मदत घेतली होती. आणि हा वग वटवून झाल्यावर आपण यशस्वी झालोय असं समजून इंदीनं सारं खरं खरं लिलीला ही सांगितलं आणि तिथेच डाव फसला. आणि आता चिंघट्याला रघ्यावरचा राग काढायची संधी चालून आली होती. त्यानं सारं कारस्थान रघ्याचं असल्याचं सरपंचाला सांगितलं. पण बायजा आक्का पुढं त्याचं काही चालणार नव्हतं म्हणून तो वर वर गप्प बसला. आणि स्वतःच्या पैशातून तात्पुरते शौचालयं ही बांधून घेतली.पण आतून काही तरी खेळी खेळायला त्यानं सुरवात केलीच होती. ही गोष्ट रघ्याला तेव्हा कळली, जेव्हा मंजी आणि रघ्या कसल्यातरी गप्पा मारत होती. आणि तितक्यात तिथे सुंदरी हजर झाली.
काय गं मंजे माझ्या नवऱ्याला कसली फुस लावतीयस. पळवून न्यायचा ईचार हाय व्हय. सुंदरीला अशी गंमत करायची सवय होती, म्हणून मंजीनं मनावर काहीच न घेता म्हणाली मी लाख पळवल गं पण तुझा आत्ये भाऊ तुला सोडल व्हयं.
अग मला सोडायला त्यानं कुठं मला धरून ठेवलीय. तुला हवं असनं तर ठेवं की खुशाल. सुंदरीनं उदारपण दाखवलं. काय रं रघ्या करशिल मंजीला बायको?
मी करल गं पण हिने हो म्हणायला नको ! आणि लग्नाला अजून खूप अवकाश हाये सुंदरे, आधी मोठं माणूस व्हायचयं काही तरी कमवायचंय. मग मंजीच काय तुझ्या संगट बी लगीन करल मी. रघ्यानं ही गंमत केली. तसे तिघे हसायला लागले.
थोडं थांबून अचानक गंभीर होत सुंदरी म्हणाली, रघ्या माझं सोड रे ! पण आता मंजीला गावात कसं थांबणार ते बघं.
का ही कुठं जातेय?
आरं ही नाही जात पण तुमचं शौचालयाचं भिंग फुटलं, म्हणून आबानं हिच्या आयची बदली थेट कोकणात केलीय.
कोण आबा? रघ्यानं प्रतिप्रश्न केला.
तुझा मामा आन माझा बा, बन्सीलाल सरपंच,... आयला यडाय का रं तू ! चल कर काही तरी रघ्या... मी येते आणि व्हा बाबांनो खूप मोठे पण मला ईसरजा नका मी आज हाय उद्या नाय काय भरवसा. असं म्हणून सुंदरी निघून गेली. ती असं का बोलली ते दोघांनाही  काहीच कळलं नाही.
सुंदरी सांगून गेली ते अगदी खरं ठरलं. बायजा आक्का तालुक्याच्या गावी गेली होती तेव्हा सरपंच रेवा कडे आला आणि नाही नाही ते बोलून गेला. म्हटला रघ्या माझाच जावाई होणार, तू तुझी पोर सांभाळ अन ही घे अॉर्डर आजच निघं उद्या पर्यंत कोकणात रूजू व्हायचंय नाहीतर नोकरी गेली. रेवाला बायजा आक्काच्या मागेच नसांगता निघून जावं लागलं ते परत कधीच न फिरण्या करता..... त्यानंतर गावात खूप उथलपूत झाली होती, कितीतरी वर्षे निघून गेली मंजीच काय झालं? कुठं गेली? रघ्याला काहीच कळलं नाही. पण त्यानं आणि मंजीनं सुरू केलेलं शौचालयाचं काम त्यानं मामाकडून पूर्ण करवून घेतलं होतं.
            तो आता गावचा सरपंच होता. गावात शाळा हायस्कूल आणि इतर बऱ्याच सुविधा सुरु करण्यात आल्या होत्या. पण मेन मुद्दा गावाच्या पाण्याचा होता. तो विरोधक पुर्ण होऊ देत नव्हते. आणि म्हणूनच आज तो आत्रे बाईंना भेटायला आला होता. एव्हाना सगळी मंडळी आपआपली गाऱ्हाणी सांगून परत फिरले होते. हा एकटाच त्या पेंटिंग कडे बघत होता. तोच तर होता त्या पेंटिंग मधला मुलगा..... डोळ्यांत आसवं भरली होती. कुणी तरी मागून येऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला, हात एका स्त्रीचा होता. ती म्हणाली राघव साठे तुमचं गाऱ्हाणं नाही सांगणार ....! त्याला तो स्पर्श ओळखीचा वाटला, आवाजात आत्मियता वाटली. त्याने मागा वळून पाहिलं, डोळ्यांत भरलेली आसवं घडाघडा वाहू लागली. समोर मंजिरी आत्रे (जिल्हाधिकारी बाई) उर्फ मंजी उभी होती. यौवनानं गच्च भरलेल्या मंजिरीला मंजी तरी कसं म्हणावे. म्हणून तो उद्गारला मॕडम आपण ! त्याच्या चेहऱ्यावरून अलौकिक आनंद ओसांडत होता. मंजिरीनं त्याला कॕबीन मध्ये नेऊन बसवलं. प्यायला पाणी दिलं. संगळ्या गावाची खबर बात विचारली. आणि शेवटी भीत भीत विचारलं,...  बायको मुलं बरी आहेत ना ?
तसं त्याने उत्तर दिले,... बायका मुलं बरी असायला ती अगोदर असणं गरजेचं असतं मंजू.
म्हणजे अजून लग्न केलं नाहिस ? का सुंदरी लग्नाला तयार झाली नाही.
सुंदरी सारख्या महान स्त्री साठी मी नव्हतोच मंजू... फक्त मरण्या आधी एकदा जरी तिचं दुःख सांगितलं असतं ना, तर जिवनभर बिन मुलाबाळांचा संसार केला असता तिच्या बरोबर. पण तिनं जे सांगितलं ते खूपच भयानक होतं आणि सांगितलं ते ही शेवटच्या क्षणाला..... मंजू बन्सी मामाला मुलगा हवा होता त्यामुळे त्यानं मामीला नको त्या हकिमाच्या नको त्या जड्या बुट्ट्या खाऊ घातल्या, आणि त्यामुळे घात झाला. काही जडीबुटींचा चांगला असर झाला. सुंदरी सुंदर जन्माला आली खरी, पण तिचे स्त्री जननांग अविकसित राहिले. जन्मापासून वयात येई पर्यंत मामीनं कुणाला कळूच दिलं नाही. पण सुंदरीला मात्र समजावून सांगितलं होतं. सुंदरीनं ते सहर्ष स्विकारलं ही होतं. आईला हे माहित असावं पण तिचा तुम्ही गेल्यानंतर २-४ वर्षात देहांत झाला होता. आणि हे सत्य मामाला माहित नसल्यामुळे, त्यांने तिचे लग्न माझ्याशी जुळवले होते. माझी इच्छा नसतांनाही मी लग्नाला तयार झालो होतो. कारण मामा खूप सुधारला होता. आणि आई नंतर त्यानंच मला सांभाळलं होत.
लग्नाची तारीख ठरली त्याच दिवशी रात्री सुंदरीनं
मला तिच्या खोलीत बोलावलं, बहुतेक तिला मला काही तरी सांगायचं होतं. मी उठून जाणार तितक्यात मामाने थोडा वेळ थांबवून एक काम सांगितलं, ते काम फटापट आटोपून मी तिच्या खोलीत पोहचलो. तर तीनं मला जवळ बसायला सांगितलं, आणि तेव्हा तिने मला हि हकिकत सांगितली. मी तरी ही तिचा हात हातात घेऊन तिचं सांत्वन करत म्हटलं..... काही हरकत नाही सोनू आपण दत्तक मुलं घेऊन त्याला वाढवू. पण मला काय माहित ती त्याही पलीकडचा विचार करत होती. ती म्हणाली... ते ठिक आहे राघव ! पण तुझं सहवास सुख हिरावून घेण्याचा मला काहीच अधिकार नाही. आणि म्हणूनच मी आधी विष घेतलं आणि मग तुला बोलावलं. आता एकच विनंती माझं हे गुपित कुणालाच सांगू नकोस. आणि सांगावं वाटलं तर फक्त मंजीलाच सांग! इतकं बोलून तिनं प्राण सोडला. साधं हॉस्पिटलमध्ये ही नेता आलं नाही गं तिला. आणि तेव्हा मला कळलं! "मी आज हाय उद्या नाय"  असं ती परत परत का म्हणायची. हे सर्व सांगता सांगता त्याचे डोळे डबडबले होते. त्यानं डोळे पुसले, व चेहऱ्यावर स्मित करत म्हणाला. माझं सोड तु तुझं सांग? रेवा आंटी कशीय? आणि ......
आणि म्हणून तो थोडा थबकला. का कुणास ठाऊक त्याचा हुंदका दाटून आला. आणि मंजुनं लग्न केलं की नाही हे विचारायच धाडस त्याला होईना.
आणि काय राघव.... बोल ना! तरीही तो गप्पच राहिला.
मंजिरी आपल्या खुर्चीवरून उठून राघव जवळ आली तो शांत खुर्चीत बसून होता. तिनं दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि हळूच त्याच्या काना जवळ जाऊन पुटपुटली.
राघवा, मी अजूनही सिंगलच आहे. तुझ्या शिवाय माझ्या मनात कधीच कुणाचा विचारही आला नाही. एक आशा होती, फक्त तुला भेटण्याची.... मी आजही तुझ्याशी लग्नाला तयार आहे. आणि सुंदरीची ही तशीच  इच्छा होती ना! बोल करणार माझ्याशी लग्न ?
राघव खुर्चीतून उठून उभा राहिला. भारावल्या सारखा तिच्या कडे बघू लागला, मंजिरीनं अलगद पापण्या लपकवत हात पसरले. आणि राघवला अलिंगन बध्द केलं, राघव लहान बाळा सारखा तिच्या कुशित हुंदके देऊ लागला. मंजिरी आपला हात त्याच्या केसातून फिरवून त्याचं मुक सांत्वन करत होती.

                   

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

प्रतिलीपी "भयकथा"

भयकथा

कापूस कोंड्याची गोष्ट