तुझं कौमार्य शाश्वत आहे
तुझं कौमार्य शाश्वत आहे !
वयाची तिशी पार झाली तरी स्वेताचं लग्न काही जुळून येत नव्हते, त्यामुळे तिची आई सरला अस्वस्थ राहू लागली होती. पोरीचं लग्न का होत नाही याचं कारण तिला काही उमगतच नव्हतं. स्वेताचं घर माझ्या अगदी घरासमोर होतं. ती माझ्या पेक्षा वयानं 5 वर्ष मोठी असल्याने मी अगदी तिच्या अंगा खांद्यावर खेळलोय असं म्हणायला काही हरकत नव्हती. माझे वडील सैन्यात नोकरीला असल्यानं घरातली सगळी कामं आईलाच करावी लागायची. आणि स्वेता तिच्या आईच्या उदरात असतांनाच तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या घरातील कामाची जबाबदारी तिच्या आईवर येऊन पडली होती. साधारणतः माझी आई आणि तिची आई पती विरह या नात्याने समदुखी असल्यानं दोघींमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला होता. तिच्या आई वडिलांच्या लग्नानंतर लगेचच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आणि माझ्या आई वडिलांना लग्नाच्या पाच वर्षानंतर माझ्या रुपात पुत्र रत्न प्राप्त झाले होते. आमचे आई वडील जरी समवयस्क असले तरी अपत्यात मात्र पाच वर्षांच अंतर पडलं होतं. स्वेता लहान असतांना आईने तिचा खूप सांभाळ केला होता. पुढे माझा जन्म झाल्यावर ती प्रक्रिया उलट झाली. माझा बराच वेळ सरला ताई कडेच जाई. आणि त्या दोघी कुठं बाहेर गेल्या म्हणजे माझी जबाबदारी स्वेतावर असे. मग शी असो की सु असो सारं स्वेतानेच करावं हा जणू नियमच झाला होता. हळूहळू आम्ही मोठे होत गेलो तसे आमच्या घरातल्यांनी आमच्या शिक्षणावर भर दिला. स्वेताला शिक्षणा सोबत पारिवारिक जबाबदारी सुद्दा होती. आता ती घरातली सारी कामं स्वतः करू लागली होती तसेच बाहेरची कामं ही ती करू लागली होती.माझ्या बाबांच्या मदतीने तिने सायकल चालवणे शिकल्याने तिचे बरेच कामं पुढे चालून हलके झाले होते. स्वेता दिसायला खूप सुंदर असल्यामुळे तिच्या अवती भोवती सदाच तिच्या समवयस्क मुलांची गर्दी असायची. ती एक निर्भेळ मुलगी असल्यानं तीनं सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले होते. शाळा कॉलेजात ही ती खास आकर्षण होती, तसेच खेळात सुद्धा ती अव्वलच असायची. मी लहान असतांना मला तिच्या भोवतालची गर्दी फारसी आवडत नसे. पण जेव्हा कळायला लागलं तेव्हा समजलं हे असं होणं साहजिकच आहे. माझा आणि तिचा मेळ जुळनं तसं संभव नसल्याने मी कधी त्या भानगडीत पडलोच नव्हतो. स्वेता साधारणपणे दहा बारा वर्षाची असावी तेव्हा ती सायकल वरून मला घेऊन फिरत असतांना धाडकन पडली होती. आम्ही दोघे गटारात जाऊन पडलो होतो. गटारातील पाणी रक्ताने लाले लाल झाल्याचं दिसत होतं. आम्ही दोघे घरी आलो. अंघोळ केली. मला साधं खरचटलं सुध्दा नव्हतं मग अर्थातच स्वेताला खूप लागलं असण्याची दाट शक्यता होती. घरी ओरडा वगैरे काही बसला नाही पण आम्ही पडल्याचं मात्र आमच्या आयांना कळलं होतं. सरला ताई त्या दिवशी खूप अस्वस्थ दिसत होती. का माहीत नाही. मी स्वेताला विचारलं तर ती ही काही बोलली नाही. काल कुठे लागलं दाखव म्हटलं तर ते ही दाखवलं नाही. वरवर तिला काहीच लागलं नसल्याचं दिसत होतं, मग नेमकं हिला झालं तरी काय ? हा प्रश्न मला पडला होता. लहान असल्याने काही कळत नाही असं समजून त्यावेळी सरला ताई आईला सांगत होती की किती लहान वयात मुलीला मासिक पाळी आलीय म्हणून आणि त्यामुळे त्या दिवशी सरला ताई अस्वस्थ वाटत होती. आणि मला खरंच त्यावेळी काही कळलं ही नव्हतं. आई ने तिला डॉक्टर कडे नेण्याचा सल्ला दिला होता पण तसं पुन्हा काही झालं नाही म्हणून बहुदा तेव्हा ते टाळलं असावं. पुढे पुन्हा एकदोन वर्षांनी जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धेत असंच झाल्यानं तिला दौरा सोडून परतावं लागलं होतं. पण पुन्हा असला अनुभव तिला आला असावा असं माझ्या ऐकण्यात नव्हता. पण वयाच्या साधारण पंधराव्या वर्षी मात्र सरला ताईने आईला सांगितले होते की स्वेताचा मासिक धर्म आता सुरळीत सुरू झाला होता. ती ही आता समंजस पणे वागू लागली होती. पण आमच्या हुंदडायवर तसा फारसा परिणाम झाला नव्हता. पुढे स्वेता पोस्ट ग्रॅज्युएट झाली. आता तिला स्थळ येऊ लागली होती. मुलगी बघायचा कार्यक्रम आयोजित व्हायचा पोरं कांदा पोह्यांवर ताव मारायचे तिच्याशी दोन शब्द बोलतो म्हणून टेरिसवर जायचे आणि नकार देऊन निघून जायचे. त्यांच्यात नेमकं काय बोलणं व्हायचं ना स्वेता सांगायची ना मुलांकडून काही कळायचं. पण स्वेता मात्र प्रत्तेक वेळी मी अस्वस्थ पहिली होती. रंगा रूपाने सुंदर सळपातल उंच बांध्याची स्वेता बघताच क्षणी कुणालाही आवडायची पण मग बिनसायचं कुठं काही कळेना. सुरवातीला स्थळं ही खूप आलीत पण नंतर ती ही यायची कमी झालीत. मी शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेलो. बाबा रिटायर्ड झाले होते त्यामुळे आईचा प्रश्न नव्हता. बघता बघता स्वेता ने तिशी पार केली मी ही पंचविशीत प्रवेश केला होता. कोवळी मिसरूळ फुटली होती. स्वेता आजही तेवीस चोविसचीच भासत होती. पण वय मात्र वाढत असल्याने सरला ताईला ताण येणं साहजिक होतं.
मी एकदा पुण्याहून घरी आलो तेव्हा आम्ही दोघांनी मिळून गोडगुलाबी थंडीत टेरिसवर खूप गप्पा मारल्या. त्या गप्पा गप्पात ती मला म्हणाली तू लग्न कधी करणार आहेस? मी म्हटलं का गं बाई तुला काय घाई माझ्या लग्नाची आणि तशीही तू मोठी आहेस आधी तुझं तर होऊन जाऊ दे लग्न ! माझं बघू नोकरी लागल्यावर.……
तुझ्या लग्नाचं काय झालं गं?
तशी ती अस्वस्थ झाली. पण तिनं लागलीच विषय बदलवत मला विचारलं काय मग अवी तू पटवली की नाही एखादी मुलगी? तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून मला आश्चर्य वाटलं. पण तरी मी तिला उत्तर दिलं. मैत्रिणी वगैरे खूप आहेत गं पण हे पटवणे वगैरे मला परवडणारे नाही. आणि तसं ही या भानगडीत न पडता मला वाटतं माणसाने टाईम पास करत पुढे निघावं. आणि पडलंच जर कुणाच्या प्रेमात तर लग्न करून मोकळं व्हावं. कुणाचं आयुष्य बरबाद करणं मला तरी पटत नाही. मला जर असं काही वाटलं तर मी अवघ्या चार महिन्यात आईला सून आणतो की नाही बघ. माझ्या या वक्तव्याने तिला बहुदा संशय आला की काय, तिनं मला लगेच प्रतिप्रश्न केला.
अवी आर यू व्हर्जिन ?
मी आवक होऊन तिच्या कडे बघू लागलो.
अरे काय झालं?
मी म्हटलो अगं मी तुझ्या सोबत लहानाचा मोठा झालोय तुला तरी वाटतं का की मी असं काही करेन ते. आणि हे तू विचारलंस म्हणून ठीक आहे पण एखाद्या मुलीनं जर मला हा प्रश्न विचारला तर माझं उत्तर असेन नाही.
आणि त्यामुळे तुझं लग्न नाही झालं तर? तिनं प्रश्न केला.
मला त्वरित क्लू भेटला मी तिला म्हटलं अगं या एका प्रश्नाने तर तुझ्या लग्नाला ब्रेक नाही ना लागलाय?
अर्थातच !
अगं काय वेडपट पणाय हा.
कुणाचा ? माझा की मला बघायला येणाऱ्या प्रत्येक सत्यवानाचा !
अरे चांगला कांदा पोह्यांचा ताव मारून झाला की हा एकच प्रश्न माझ्या समोर येतो.
आर यू व्हर्जिन ?
मग मी त्याला प्रति प्रश्न करते. तुझं काय तू ठेवलंय का तुझं कौमार्य शाबूत
आणि हा प्रश्न रुपी उत्तर ऐकून तेच फुरररर होतात आता यात माझी काय चूक आहे तूच सांग.
अरे मी वयाच्या दहाव्या वर्षी सायकलीवरून गटारात पडले, तेव्हाच योनीचा पडदा पहिल्यांदा फाटला. पुढच्या वेळेस कब्बडी स्पर्धेत तोच अनुभव आला. घरातली काम खेळ सायकलिंग पोहणं कसं राहील कौमार्य शाबूत अवी?
जो बघायला आला त्यानं हाच प्रश्न केला .
अरे एक बहाद्दर तर म्हटला पहिल्या रात्री रक्त प्रवाह नाही झाला तर लग्न मोडून काढुयात.
दुसरा अजून एक कळस करणारा तर म्हटला आपण आधी रात्र सोबत घालवू आणि कौमार्य शाबूत असेल तरच लग्न करू. चालेल?
त्याच्या तर मी मुस्काटात च लगावली होती. अवी जेव्हा वहात जाण्याचं वय होतं तेव्हा नाही वहात गेली मी कधी मग आता या भामट्यांच्या नादात वाटोळं करून घ्यायचं का?
मला खूप आश्चर्य वाटलं की एकविसाव्या शतकात सुद्धा अशा विचारांची माणसं शिल्लक आहेत तर. आपल्या देशात कौमार्य चाचणी, खातना, कुकरी सारख्या प्रथा अजून ही कशा बरं शिल्लक असाव्यात. एकी कडे आपण आधुनिकतेचा आव आणतोय आणि दुसरीकडे मागासलेले विचार घेऊन जगतोय हे दुर्दैव नव्हे तर काय? दुसरी गोष्ट अशी चाचणी फक्त स्त्रीयांसाठीच का? पुरुषांना का नाही. बरं असू दे चाचणी पण ती कितपत खरी असेल याची शाश्वती काय?
(कौमार्य चाचणी म्हणजे काय हे आपल्या किशोरवयीन अबोध वाचकांसाठी)
तर कौमार्य म्हणजे स्त्री योनीत निसर्गतः एक पडदा असतो. त्या पडद्याचे फाटने म्हणजे कौमार्य भंग होणे असं मानलं जातं. तो पडदा कधी कधी खूप पातळ किंवा खूप जाड ही असू शकतो. हा पडदा शाबूत असणे म्हणजे कौमार्य टिकून आहे असे मानले जाते.
मग शारीरिक व्यायाम खेळ वैगेरे मुळे पातळ पडदा फाटला म्हणजे कौमार्य नष्ट झाले असे समजावे का!
की एखाद्या मुलीच्या योनीतील पडदा जाड असेल आणि तिनं कितीतरी वेळा शरीर सुख घेऊन ही तो पडदा फाटला नसेल तर तिचं कौमार्य शाश्वत आहे असं समजावं का? नाही ना मग कधी बदलणार आहे हा समाज देव जाणे?
मी कधीही स्वेता कडे प्रेमाच्या नजरेने पाहिले नव्हते. पण आज मला तिच्या पेक्षा परिपक्व स्त्री कुणी दिसत नव्हती. म्हणून आमच्या वयातील फरकाकडे लक्ष न देता मी टेरिसच्या भिंतीवरून उठून स्वेता समोर गुढगे टेकले आणि तिच्या अनपेक्षित पणे तिला मागणी घातली
"विल यू मॅरी मी?"
ती अशा अनपेक्षित मागणीने कावरी बावरी झाली तिला काय बोलावे काहीच कळत नव्हतं.ती फक्त माझ्याकडे आवक होऊन बघत होती. मी पुन्हा तेच शब्द उच्चारले !
"करशील माझ्याशी लग्न?"
ती एकदा लाजली आणि चक्क माझ्या कुशीत शिरली. तितक्यात पाठी मागून अचानक टाळ्यांचा आवाज येऊ लागला आम्ही मागे पाहिलं तर आईबाबा आणि सरला ताई टेरिस वर येऊन पोहचले होते. आमच्या या निर्णयामुळे ते आनंदी असल्याचे त्यांच्या टाळ्यांच्या कडकडातून जाणवत होतं.
मी तिला मिठीतून मोकळं करत हळूच तिच्या कानात पुटपुटलो. अर्थात तो चावटपणा होता हे तिलाही माहीत होतं आणि मला ही...
आय नो यू व्हर्जिन !
आणि तिनं तिथे उभे असलेल्या तिघांनाही दुर्लक्षित करून मला करकचून मिठी मारली. ती मिठी आज ही मला टेरिसवरच्या गोडगुलाबी थंडीची ऊब देत आहे.
लेखक :- शिवा चौधरी
जामनेर, जळगांव
Whats app 8275493221
बोला ९९१४३२०२५७
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें