माझ्या बायकोचा नवरा ?
माझ्या बायकोचा नवरा ?
विचित्रच वाटतंय ना ! सुरवातीला मला ही जरा विचित्रच वाटलं होतं. अरे असाही काही विषय असू शकतो का? लोकं किती सहज घेतील ही गोष्ट, किती जणांना पटेल हे? पण एक साहित्यिक या नात्यानं मला त्यावर विचार करणं भाग होतं. कारण तुम्ही जरी अशा विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला ना, तरी राहून राहून असे विषय समोर येतातच. आणि हेच विषय तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत. माझं ही अगदी तसंच झालं होतं. मग मी सोशल मीडिया चा सहारा घेऊन एका ग्रुपवर या विषयावर चर्चा सुरू केली. सुरवातीला छान अभिप्राय आलेत. काही जणांना वेगळं ही वाटलं, एकाला तर हा विषय इतका झोंबला की त्याने मला त्या गृप वरून काढूनच टाकलं. आता तो कोण होता हे मला ही सांगता येणार नाही. पण बुरसटलेल्या विचारांचा असावा हे मात्र मी निश्चित सांगू शकतो. आणि नंतर मग त्या चर्चेवर पडदा पडला. पुढे तो विषय पुन्हा माझ्या समोर आला आणि मग मी लिहता झालो.
तर मित्रांनो गुरुनाथ सुभेदार आणि शनाया ची ती सिरीयल काय नाव तिचं ? हो "माझ्या नवऱ्याची बायको" तर ही सिरीयल सारा महाराष्ट्र रोज आनंदाने बघतो. मग तो पुरुष असो अथवा स्त्री…… पण आता मला सांगा किती असे व्यक्ती असतील ज्यांनी या बाबतीत थोडा उलट विचार केला असेल. किती लोकांना असे वाटत असेल की माझ्या बायकोचा नवरा ही सुद्धा कॉन्सेप्ट तयार होऊ शकते. पुरुषांचं सोडा एखाद्या स्त्रीला तरी असं वाटतंय का की एका स्त्रीचे दोन नवरे असावेत ! नाही ना ? मग का विरोध होत नसावा असल्या प्रकरणांचा, का पुरुषा साठी अश्या प्रकारची सूट असावी. या विधानावर तर एका महाभागाने चक्क धर्म ग्रंथाचे पुरावे देऊन पुरुष कसा योग्य असतो हे सिद्ध करायचा प्रयत्न केला. मात्र त्याची पुरणाची वांगी तेव्हा अपुरी भाजली गेली जेव्हा त्याला द्रौपदीचं उदाहरण देऊन विचारणा केली , की तुला जर एखाद्या विवाहितेचा पहिला पती सोबत असतांना दुसरा म्हणून आयुष्यभर तिच्या सोबत राहायला सांगितलं, तर राहशील का? तेव्हा मात्र साहेबांची बोबडी वळली. या सगळ्यातून मनोरंजन म्हणून एखादी कहाणी लिहता जरूर येऊ शकते. आणि मी माझ्या प्रिय वाचकांसाठी आज नाही पण शक्य झाल्यास अशी मनोरंजनात्म कथा लिहण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेच. आणि तीही कुठल्याही वास्तविक किंवा काल्पनिक स्त्रीच्या चारित्र्याशी न खेळता करणार आहे .
असो हे जर सत्यात बघायची इच्छा कुणाला असेलच, तर त्याला मात्र त्यासाठी; निदान भारतात तरी, शेकडो वर्षे वाट बघावी लागेल. आणि तरी ही ते शक्य होईलच असेही काही नाही. कारण असंख्य धार्मिक थोतांडात पूर्णतः गुरफटलेले आपण, साधं सुधं परिवर्तन लवकर स्विकारत नाही. मग पौरुषत्वावर घाव घालणारं हे परिवर्तन आपण खरंच मान्य करू शकू का?
आणि म्हणूनच असे प्रश्न कधीकधी उपस्थित होतात. त्यामुळेच या वाक्यपुढे मला आज प्रश्न चिन्ह वापरावे लागले.
माझ्या बायकोचा नवरा ?
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें